7/30/2008

ऊब

एकदा अकबराने पैज लावली
पडली होती खूप थंडी
रात्रभर पाण्यात राहून
जिंका म्हणाला नाणी बंदी !

अनोखी पैज जिंकण्यासाठी
दुरुन लोक आले, मात्र
कुणालाही जमले नाही
पाण्यामधे काढणे रात्र

तरुणाने एका पैज मारली
होती जरी खूप थंडी
द्वेषाने मात्र लोकांनी काही
पिकवली वेगळीच कंडी

पाण्याच्या हौदापाशी होते
रात्रभर दिवे जळत
दिव्यांपासून त्या म्हणे
तरूणाला होती ऊब मिळत !

दुष्ट त्या लोकांचा पटला
बादशहाला बहाणा
रित्या हाती पाठवले त्याने
बहाद्दर त्या तरूणा

बिरबलाला बोलावण्या मग
राजाने दिले लोक पाठवून
उलटा निरोप देई तो, सांगा
येतो मी खिचडी शिजवून

बराच वेळ होवूनही
बिरबल नाही आला
पुन्हा लोक पाठविता
तसाच त्याचा निरोप आला

वाट त्याची पहाता पहाता
दुपारही गेली उलटून
काही केल्या होईना परंतु
बिरबलाची खिचडी शिजवून

अजून कशी होत नाही
खिचडी याची शिजवून बरे
स्वतः अकबर निघे म्हणत
जाऊन घरी पाहूया खरे !

पाहून दृष्य बिरबला घरी
बादशहाने तर ताणली भुवई
ऊंच तिवईला बांधूनभांडे
खालून बिरबल आंच देई


बादशहा म्हणे अरे वेड्या
उगाच का करुन घेशी जाच !
बांधून इतकी उंच तिवई
खिचडीला कशी मिळावी आंच ?

हौदापासच्या दिव्यांनी मिळाली
तरूणाला त्या ऊब जशी
कधीतरी शिजेल बरं
खिचडीही माझी तशी

बिरबलाचे ऐकुन बोल
बादशहाला चूक आली ध्यानी
बोलावून त्या तरूणा त्याने
दिली बक्षिसी अन् बंदी नाणी !



















No comments: