8/02/2008

बा निज गडे ...


अंगाई ऐकत कोणाला झोपायला आवडणार नाही? मला मामाने ही कविता गात झोपवल्याचे चांगले आठवते. या गीताइतकीच त्याला मामाने लावलेली चाल सुंदर आहे!
काळाच्या ओघात ही कविता मी विसरलो; परंतु चाल अन् धृपद मात्र लक्षात राहिले. जुईच्या जन्मानंतर तिच्यासाठी अंगाई गायची वेळ आली तेंव्हा मात्र ही कविता माहित नसल्याची सल मनात राहिली.
नंतर केंव्हातरी ही आख्खी कविताच हाती आली, आणि मराठी भाषेतल्या निवडक कवितांच्या राशीत बसण्याइतपत योग्यता, खुद्द कुसुमाग्रजांच्या मते, असल्याचे कळताच आश्चर्याचा सुखद धक्का बसला!



कवि: दत्त (दत्तात्रय कोंडो घाटे १८७५-१८९९)
इंदूर, सराफा सप्टेंबर १८९७

(कुसुमाग्रजांनी संपादित केलेल्या निवडक कवितांपैकी एक
)

बा निज गडे नीज गडे लडिवाळा
निज नीज माझ्या बाळा || धृ ||

रवि गेला रे सोडुन आकाशाला
धन जैसे दुर्भाग्याला
अंधार वसे चोहिकडे गगनात,
गरिबाच्या जेवि मनात
बघ थकुनी कसा निजला हा इहलोक,
मम आशा जेवि अनेक
खडबड हे उंदिर करिती
कण शोधाया ते फिरती
परि अंती निराश होती;
लवकरि हेही सोडितील सदनाला
गणगोत जसे आपणाला || १ ||

बहु दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती
कुजुनी त्या भोके पडती
त्यामधुनी त्या दाखविती जगताला
दारिद्र्य आपुले बाळा
हे कळकीचे जीर्ण मोडके दार
करकरकर वाजे फार ;
हे दु:खाने कण्हुने कथी लोकाला
दारिद्र्य आपुले बाळा
वाहतो फटीतुन वारा;
सुकवितो अश्रुधारा ,
तुज नीज म्हणे सुकुमारा !
हा सूर धरि माझ्या या गीताला
निज नीज माझ्या बाळा || २ ||


जोवरती हे जीर्ण झोपडे आपुले
दैवाने नाही पडले,
तोवरती तू झोप घेत जा बाळा;
काळजी पुढे देवाला !
जोवरती या कुडीत राहिल प्राण;
तोवरि तुज संगोपीन ;
तदनंतरची करू नको तू चिंता;
नारायण तुजला त्राता
दारिद्र्या चोरिल कोण ?
आकाशा पाडिल कोण ?
दिग्वसना फाडिल कोण ?
त्रैलोक्यपती आता त्राता तुजला;
निज नीज माझ्या बाळा || ३ ||

तुज जन्म दिला सार्थक नाही केले;
तुज काही न मी ठेविले
तुज कोणि नसे, छाया तुज आकाश;
धन दारिद्र्याची रास;
या दाहि दिशा वस्त्र तुजला सुकुमारा;
गृह निर्जन रानी थारा;
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही;
भिक्षेविण धंदा नाही
तरि सोडु नको सत्याला
धन अक्षय तेच जिवाला
भावे भज दीन दयाळा;
मग रक्षिल तो करुणासागर तुजला
निज नीज माझ्या बाळा || ४ ||