4/19/2009

छंद डोकावला !


कॅमेरा घ्यायचं खूप वर्षांपासून मनात होतं परंतु योग नव्हता असंच म्हणावं लागेल. काहीनाकाही कारणांमुळे priority बदलत गेल्या आणि कॅमेरा घायचं राहून गेलं. तशातंच US ला जायचा योग आला अन् कॅमेरा घ्यायचाही. तिथं एक आपलं बरं आहे- वस्तु आवडली नाही की बिनबोभाट परत करता येते. त्यामुळं हिम्मत केली. थोड्याच दिवसात कॅमे-याला सरवलो. काही महिन्यांनी जुईचा जन्म झाला आणि मला एक हक्काची model मिळाली. तिच्याशी खेळत-खेळत मी फोटोही काढायला सुरुवात केली. आम्ही सातासमुद्रापल्याड असल्यामुळे फॊटो हे एकच साधन ऐलतिरीवरच्या सग्यासोय-यांशी तिची भेट घडवू शकत होतं.
एकदा मला जाणवंलं की सकाळी स्नान झाल्यावर जुईचा mood खूपच छान असतो, तेव्हा एका weekend ला स्नानानंतर लगेच फॊटो काढले. मला आठवतं तिचं अंग नि केस जुजबी कोरडे केले होते आणि बाल्कनिच्या दारासमोरच्या कोवळ्या प्रकाशात तिला बसवलं होतं.
फोटो अर्थात खूपच छान आले. त्यातला एक चांगला मोठा करून भिंतीवर लावला. मित्रमंडळींनीही खूप कौतुक केलं. या निमित्तामुळे कदाचित मनात दडलेला छंद असा बाहेर डोकावला !
आता पूनमनंही मी एक ’चांगला’ कॅमेरा घ्यावा असा आग्रह धरला. माझ्या फोटोतलं वेगळेपण तर तिला जाणवलं नसेल?

4/18/2009

झाकिर



याची बोटं तबल्यावर अशी काही नाचतात की त्या नादलहरींवर कायमंच हिंदोळत रहावं ! तुम्ही याचा तबला ऍकलात की लगेचंच जाणवेल, हे वेगळंच रसायन म्हणून. एकदा ’ऊर्जा’ थीम घेऊन शनवारवाड्यावर कार्यक्रम होता. महागडी आहेत म्हणून न जायचं ठरवूनही पूनमनं surprise म्हणून तिकिटं काढलीच (ती पण त्याच्या तबल्यासाठी एवढी वेडावली, हे मला पहिल्यांदाच जाणवलं). फोटोसाठी कार्यक्रमाची कडेकोट सुरक्षा भेदायची माझ्या भिडस्त स्वभावाची तयारी होईना. अर्थात् फोटो काढले नाहीतच. पुढल्या वर्षी पुन्हा कार्यक्रम, महागडी तिकिटं वगैरे समस्या सोडवून हजेरी लावली. यंदा तबलामूर्ती लेन्सच्या टप्प्यात येणारच म्हणून कोण उत्साह ! पण हाय ! स्टेजवर अगदीच मंद दिवे. अशा परिस्थितीत फोटो येणं दुरापास्तंच. तसाच चुळ्बुळत तबला ऍकत राहिलो. फोटॊ काढायची ऊर्मी मात्र स्वस्थ बसू देईना. जरा वेळानं उठलो. पूनमला म्हट्लं जरा प्रयत्न करून बघतो. आता काहीही करून स्टेज जवळ जाणं भाग होतं.
तिथं पोहोचायचं म्हणजे VVIP दरवाज्यातनं प्रवेश. इथंही कडेकोट सुरक्षा. रखवालदारही खूपच कर्तव्यदक्ष. काही केल्या दाद देईना. त्याचंही बरोबरंच होतं -आपलं कामच करत होता बिचारा. शेवटी त्यालाच म्हटलं तूच काही उपाय सांग. त्याचं उत्तरही तयारच होतं - साबसे पूछो. तेवढयात आमचं हे हितगूज ऍकून, एक ’बिल्लाधारी’ इसम आला. त्यानंही Only boss can help you म्हणून हात झटकले. आणि काय योगायोग बघा. हे काय चाललंय बघायला दस्तुरखुद्द boss हजर!. हा boss म्हणजे त्या कार्यक्रमाचा event manager होता. त्याल माझी कैफियत ऐकवली न ऐकवली तोच तो म्हणतो कसा, ’why not, please come with me sir' ! आणि मला जणू escort केल्यागत इच्छित स्थळी घेऊन गेला. मी मनसोक्त फोटो काढले हे आता सांगायला नकोच. इथं दिलेला हा फोटो मात्र केसरी गौरव सोहळ्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमावेळचा आहे. इथंही सुरक्षाव्यूह भेदण्याचा पराक्रम करावा लागला. घटम् बरोबर रंगलेल्या जुगलबंदीत झाकीरनं किती उस्फूर्त अन् भावविभोर दाद दिलीए, नाही?

बाप्पा मोरया


पुण्यातला श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती कुणाला बरं माहित नाही? नितांत सुंदर पद्मासनात बसलेली मंगलमूर्ती, रुपेरी मखरात बसून कशी भक्तांना दिलासा देत असते. अशी सात्विक भाव दर्शवणारी आणि पाहताच नजर खिळवून ठेवणारी मूर्ती तशी दुर्मिळच, नाही का?
लाडक्या दैवताला कुणी तरी म्हटलं आहेच की, रूप तुझे पाहता समोरी । चित्त वळे ना माघारी ॥ मी नेमाने नाही तरी प्रसंगी मुखदर्शन चुकवित नाही!

कॅमेरा हातात आल्यावर साहजिकच फोटो घेण्यासाठी प्रयत्न चालू केले. मंदिरात कॅमेरा बंदी आणि चोरुन फोटो न काढण्याचा शिरस्ता-मुळे यामुळे काही योग येईना. गेल्या वर्षी गणपती उत्सवात ठरवले की यंदा पूर्ण प्रयत्न करायचाच. उत्सव मंडपात ’झूम’ वापरून फोटो काढता येण्याजोगा आहे; पण दर्शनाला गर्दी किती! या गदारोळात फोटो काढणं दूरच कॅमेरा नुसता हातात धरता आला तरी खूप. मग पुन्हा एकदा प्रयत्न करायचं ठरवलं. भल्या पहाटे मंडपात पोहोचलो- गर्दी होतीच पण जरा कमी त्रासदायक. मग हळूच रांगेतून एका बाजुला होउन मनसोक्त फोटो काढले. इथे दिलेला हा मला सर्वात जास्त आवडलेला. कुणीतरी दाद देऊन म्हटलं, "हे तर बाप्पाचं पोर्टेट्चं की !" मी ही म्हटलं, खरंच; माझ्या डोक्यात हे आलं नव्हतं. तुमच्याही डोक्यात आत्ताच आलं, खरंय ना?