7/27/2008

पाठीराखा


अकबराच्या राजधानीत
रहात होता एक गरीब
कामधंदा करुन तो
आपले पोट असे भरीत १

त्याच शहरात होते रहात
लोक काही मवाली
एकदा त्यांनी ठरवले
करुया त्याची टवाळी २

मवाल्यांनी त्या मग
शहरभर उठविली अफवा
तोंड त्याचे पहाटे पहाता
दिवस वाईट जातो आपला ३

बघता बघता बातमी ही
पोहोचली दरबारात !
करुया याची शहानिशा
बादशहा ठरवी मनात ४

दुसर्‍या दिवशी सकाळीच
निघे बादशहा वेष बदलून
थोड्याच वेळात परते तो
गॄहस्थाला त्या भेटून ५

योगायोग अगदी विचित्र
असा काही मग घडला
दिवस तो बादशहाला
खूपच अगदी वाईट गेला ६

बादशहा त्यावर मग
गृहस्थावर त्या संतापला
हरामखोराला द्या सुळी
रागाने तो कडाडला ! ७

गृहस्थाची तर त्या
पाचावरती बसली धारण
मुकेल का तो जीवाला
नसतांना काहीच कारण ? ८

कळता हे बिरबलाला
त्याने गृहस्थाची घेतली गाठ
योजना आपली समजावून
सांगितली त्याच्या कानात ९

शिपायांनी गृहस्थाला
आणले शोधून दुपारी
सुळी देण्याची अन्
करु लागले तयारी १०

सरदार शिपायांचा मग
करे गृहस्थाची पृच्छा
मरणाआधी तुझी बरे
पुरी करावी कोणती इच्छा ? ११

गृहस्थ म्हणे मग, माझी
इच्छा आहे खूपच साधी
दवंडी पिटवून घाला, परंतु
सर्वांच्या कानावर आधी ! १२

पाहून माझे तोंड पहाटे
बादशहाला गेला दिवस वाईट
पहाता पहाटे तोंड त्याचे
मी तर गेलो मरणाच्या खाईत ! १३

माझ्यावरुन लोकहो
धडा घ्यावा हा बरा,
पहाटे पहाटे बादशहाचे
तोंड पाहू नका जरा ! १४

बादशहा करी सुटका त्याची
येता चूक आपली ध्यानी
पाठीराखा बिरबलच याचा,
ओळखे तो मनोमनी ! १५


२५.९.९४



























No comments: