पुण्यातल्या गृहिणींना तुळशीबागेला भेट दिल्याशिवाय बहुधा करमत नसावं. त्याशिवाय का तिथे सदानकदा गर्दी असते? त्याला पूनमही अपवाद नाही. अशा तु.बा.वारीत माझाही बहुतेक वेळा सहभाग असतो. अपवाद फक्त कुणा ’पाहुणी’-मंडळी सोबत जाण्याचा. अशा बाजारगर्दीत हरवलेलं एक चिरशांत ठिकाण म्हणजे राममंदिर. इकडे आलं म्हणजे आपसूक माझी पावलं तिकडं वळतात. दुकानाआड लपलेल्या छोट्याश्या दरवाज्यातून हळूच आत बोळात शिरावं. बोळात आजूबाजूला दिसतात काही antique ची दुकानं. जरा डोकावून बघावं तर देवदेवतांच्या हरतह्रेच्या मूर्ती, एकेकाळी (जुन्या?) वापरली जाणा-या पितळी चीजवस्तु छोट्याशा खोपटात खचाखच भरून असतात. अशा नाविन्यपूर्ण सहसा न आढळणा-या गोष्टी पाहून हरखून जायला होतं. असं डोकावत पुढं सरकत जातो न जातो तोच आपण येतो एका भव्य आवारात. समोर दिसतं ते पेशवेकालीन तुळशीबागेतलं राम मंदिर ! (हेच ते ज्याला चिमणरावांनी आप्तेष्टांसह नव्या मोटरीतून प्रदक्षिणा घातली होती.).मंदिराचं बांधकाम बहुतांशी लाकडी. त्यात सुंदर मूर्ती. सायंकाळची वेळ असेल तर बायकां भजन-नामजपात मग्न. थोडेफार उतारवयातील भाविक इकडंतिकडं, आणि शांतता ! एवढ्या मध्यवस्तीत अशी शांतता दुर्लभच, नाही का ? नाही म्हणायला मंदिराच्या आजुबाजुला बरीच दुकानं आहेत, परंतु तुळशीबागछाप गर्दी तिथं नाही.
असाच परवा सहकुटुम्ब तिथं गेलो. नंदनला घेऊन गर्दीत हिंडायला नकॊ म्हणून मी त्याला घेऊन मंदिरासमोरच्या कट्ट्यावर बसलो.
रात्री पावणेआठ्ची वेळ. मंदिरात बहुधा आरतीची तयारी चालू असावी. नगारखान्यात live नगारा वाजत होता. कितीतरी वर्षांनी नगारा ऎकून हरखून गेलो. हल्ली मंदिरात यांत्रिक-एकसुरी नगारे बसवलेले असतात. त्यात कुठली आलिए मजा. इकडं नगारा वाजत असता मंदिरातून घंटानाद ऎकू येऊ लागला. आरती चालू झाली तर ! एका लयीत हे संगीत कितीतरी वेळ चालू होतं आणि हे केंव्हा संपलं कळलंही नाही. जरा वेळानं हातात कर्पूरारतीचं तबक घेऊन केशरी सोवळं नेसलेले पुजारीबुवा डुलत डुलत आले. मंदिराभोवतीच्या देवतांना ऒवाळत काही भाविकांना आरती दिली. हे सगळं वातावरण मनाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेलं. नंदन नि मी बसलो होतो त्या ठिकाणाहून पूर्ण मंदिर नजरेत सामावत होतं. तशातच sketch करण्याची ऊर्मी आली. मग मनोमनी ते रिचवलं अन वेळ मिळताच तसंच कागदावर डाउनलोड केलं !