4/18/2009

बाप्पा मोरया


पुण्यातला श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती कुणाला बरं माहित नाही? नितांत सुंदर पद्मासनात बसलेली मंगलमूर्ती, रुपेरी मखरात बसून कशी भक्तांना दिलासा देत असते. अशी सात्विक भाव दर्शवणारी आणि पाहताच नजर खिळवून ठेवणारी मूर्ती तशी दुर्मिळच, नाही का?
लाडक्या दैवताला कुणी तरी म्हटलं आहेच की, रूप तुझे पाहता समोरी । चित्त वळे ना माघारी ॥ मी नेमाने नाही तरी प्रसंगी मुखदर्शन चुकवित नाही!

कॅमेरा हातात आल्यावर साहजिकच फोटो घेण्यासाठी प्रयत्न चालू केले. मंदिरात कॅमेरा बंदी आणि चोरुन फोटो न काढण्याचा शिरस्ता-मुळे यामुळे काही योग येईना. गेल्या वर्षी गणपती उत्सवात ठरवले की यंदा पूर्ण प्रयत्न करायचाच. उत्सव मंडपात ’झूम’ वापरून फोटो काढता येण्याजोगा आहे; पण दर्शनाला गर्दी किती! या गदारोळात फोटो काढणं दूरच कॅमेरा नुसता हातात धरता आला तरी खूप. मग पुन्हा एकदा प्रयत्न करायचं ठरवलं. भल्या पहाटे मंडपात पोहोचलो- गर्दी होतीच पण जरा कमी त्रासदायक. मग हळूच रांगेतून एका बाजुला होउन मनसोक्त फोटो काढले. इथे दिलेला हा मला सर्वात जास्त आवडलेला. कुणीतरी दाद देऊन म्हटलं, "हे तर बाप्पाचं पोर्टेट्चं की !" मी ही म्हटलं, खरंच; माझ्या डोक्यात हे आलं नव्हतं. तुमच्याही डोक्यात आत्ताच आलं, खरंय ना?

No comments: