5/09/2009

कौशिकी


कौशिकी एके वर्षी सवाई मध्ये गाईली परंतु काही कारणाने माझे ते गाणे ऎकणे हुकले. समस्त पुणेकरांप्रमाणे पूनमला तर तिचा आवाज अन गायकी आवडली होती आणि मी एक चांगला कार्यक्रम चुकवला आहे याची जाणिव तिनं करून दिली. बहुधा महिन्याभरातच रसिकाग्रहास्तव पुन्हा एकदा तिचा कार्यक्रम झाला जो अर्थातच मी चुकवला नाही. यावेळी मात्र माझ्याकडॆ झूम लेन्स नव्हती आणि फार क्लोज फोटो घेता येत नव्हते. मध्यंताराच्यावेळी मी धीर करून स्टेजच्या बाजूच्या जागेत गेलो. ही एकच जागा अशी होती जेथून मला ब-यापैकी चांगले फोटो घेता येऊ शकणार होते. मग मी आलटून पालटून डाव्या/उजव्या बाजूने फोटो काढले. अशा प्रसंगी एका बाजूने फॊटो काढतांना ब-याच मर्यादा येतात. कधी वाटतं की सहवादन करणा-या कलाकारांच्या जागा नेमक्या अशाच का असतात की फोटो काढणा-या व्यक्तीला गायन/वादन करणा-याचा फोटो काढताच येऊ नये? इकडून तिकडून जरा स्कोप मिळालाच तर microphone, त्याचा stand नाहीतर त्याची wire हमखास मध्ये लुड्बूड करणार. या सर्व जंजाळातनं angle मिळवतांनाच नाकी नऊ येतात. बरं ही सर्व कसरत करत असतांना आपल्यामुळे कलाकारांची तंद्री भंगणार नाही याची तर सतत काळजी घ्यावी लागते. असो.
तर यावेळी angle ची शोधाशोध चालू असतांना backdrop ला एक छिद्र असल्याचे माझ्या लक्षात आलं. सहज डोळा लावून पाहिलं तर काय आश्चर्य ! खूपच अनोखा angle मला गवसला होता. परंतु एक अडचण होती. ते छिद्र लेन्सच्या मानाने जरा लहान होते. मग मी हळूच, कुणी बघत नाहीना याची खात्री करून, ते छिद्र जरा मोठे केले अन भराभर फोटो काढत गेलो. न जाणो कुणी येऊन हवी तशी पोझ मिळायच्या आधीच हकलून दिले तर? माझ्या सुदैवानं कौशिकीनंही नेमक्या त्याच वेळी एका बाजूला बघत तान घेतली आणि हा अगदी वेगळा फॊटो निघाला ! तुम्ही कधी अशा मैफिलीत फोटो काढले असतील तर नक्कीच जाणवेल की असा angle आणि पोझ मिळणे म्हणजे निव्वळ नशिब, नाही का ?

No comments: