
कॅमेरा घ्यायचं खूप वर्षांपासून मनात होतं परंतु योग नव्हता असंच म्हणावं लागेल. काहीनाकाही कारणांमुळे priority बदलत गेल्या आणि कॅमेरा घायचं राहून गेलं. तशातंच US ला जायचा योग आला अन् कॅमेरा घ्यायचाही. तिथं एक आपलं बरं आहे- वस्तु आवडली नाही की बिनबोभाट परत करता येते. त्यामुळं हिम्मत केली. थोड्याच दिवसात कॅमे-याला सरवलो. काही महिन्यांनी जुईचा जन्म झाला आणि मला एक हक्काची model मिळाली. तिच्याशी खेळत-खेळत मी फोटोही काढायला सुरुवात केली. आम्ही सातासमुद्रापल्याड असल्यामुळे फॊटो हे एकच साधन ऐलतिरीवरच्या सग्यासोय-यांशी तिची भेट घडवू शकत होतं.
एकदा मला जाणवंलं की सकाळी स्नान झाल्यावर जुईचा mood खूपच छान असतो, तेव्हा एका weekend ला स्नानानंतर लगेच फॊटो काढले. मला आठवतं तिचं अंग नि केस जुजबी कोरडे केले होते आणि बाल्कनिच्या दारासमोरच्या कोवळ्या प्रकाशात तिला बसवलं होतं.
फोटो अर्थात खूपच छान आले. त्यातला एक चांगला मोठा करून भिंतीवर लावला. मित्रमंडळींनीही खूप कौतुक केलं. या निमित्तामुळे कदाचित मनात दडलेला छंद असा बाहेर डोकावला !
आता पूनमनंही मी एक ’चांगला’ कॅमेरा घ्यावा असा आग्रह धरला. माझ्या फोटोतलं वेगळेपण तर तिला जाणवलं नसेल?